गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

बाबा; फक्त तुमच्यासाठी,


सागरागत माया तुमची,
आभाळागत विशाल,तुमचे मन ;
वटवृक्षापरी सावली तुमची,
ओंजळी भरून वाहिली,
दिलेत इतुके 'आनंदाचे धन'....

कधी व्यक्त करायचे राहून गेले,
कधी शब्दच ना सापडले;
पण 'बाबा' तुमचे हे प्रेम,
जीवनात अत्तरागत दरवळले,
गंध देऊनी सुखाचा,
सारेच कसे स्वर्गगत वाटले.....!!!

-तुमची लाडकी लेक ;
                      माधवी (मनाली)..!!

बुधवार, २९ सप्टेंबर, २०१०

'हरविली ती माणुसकी '

माणुसकीला हरविलेल्या जगात,
शोधू कुठे मी स्वतला??
कळीनेहि उमलायचे नाकारले जिथे,
बीज रोवायचे धाडसही होईना,आता मला...!!!
                               -माधवी (मनाली कुळकर्णी )

सोमवार, २७ सप्टेंबर, २०१०

माझी उमेद



समुद्राच्या पाण्यात मला खेळायला फार आवडतं;
लाटांच्या खळखळणाऱ्या आवाजाने माझे मन खूप सुखावत...

गूढ,खोल,अथांग,क्षितीज असणाऱ्या सागराकडे,
मी आपोआपच खेचली जाते ;
अन जाणवते कि,
पहिल्या प्रेमाचे आकर्षणही याहून काही वेगळे नसते...

अंगावर आदळणाऱ्या त्या लाटा,मला नखशिखांत भिजवतात,
त्यांचा हक्कच,त्या बजावतात ;
रक्तापेक्षा हि श्रेष्ठ,अशी नातीच जणू
त्यावेळी अलगद येऊन,मला मिठी मारतात ..

आपादमस्तक भिजवणारी ती लाट,
जाते परत निघून,
मला मात्र त्या 'कटू' आठवणींमध्ये सोडून,
काहीशी दुखावून ;
निसटत्या वाळूसम मागे पडतो भूतकाळ,
अन गालावरून नकळत घरंगळणारी,
ती खारट चव,
समुद्राच्याच पाण्यात कुठेतरी,
मग जाते विरघळून....

कधी अल्लड ,कधी मिश्कील,
अश्या समुद्रातून अजून एक लाट येते,
परत मला नाहू घालते ;
पण ह्यावेळी मात्र,
'भूत' आणि 'भविष्य' यामधील,
दूर सरलेल्या ' वर्तमानात '
मला जगायला  शिकवते...

बेधुंद होऊन,त्यानंतर मी येणाऱ्या प्रत्येक लाटेत,
स्वताला हरवून बसते ;
थोडीशी मस्ती,थोडीशी खोडकर अन थोडीशी लहान,
यांसह मी त्या लाटांशी तासन -तास खेळत राहते.....

अश्या निरागस आनंदाचे,
अन वेळेचे गणित कधीच का जमत नाही??
खंत हि माझी अन समुद्राची हि,
आता ओहोटीकडे कडे झुकू लागते ;
अखेर सूर्य हि मावळतो,
दिवसही पांगतो,
पण चेहऱ्यावर उमटलेली,
समाधानाची पुसटशी लकेरही,
माझ्या जगण्याला मात्र,
नवी उमेद देऊन जाते,
नवी उमेद देऊन जाते....!!!!!

   -माधवी (मनाली कुळकर्णी)


रविवार, २६ सप्टेंबर, २०१०

आकार




रंगुनी रंगात,रंग माझा वेगळा;
    साचे सारेच एक परी,घडणारा आकार तो वेगळा .....!!!
-माधवी (मनाली कुळकर्णी )

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०१०

अन्तःकरणातील प्रश्न


    कोणास जवळ करावं,कोणास दूर लोटाव,
हे ज्याचे त्याने ठरवावं;
कधी जवळचेच चटके देऊन जातात,
   तरी कधी दूरचे त्या चटक्यांवर मलम लावतात...!

-माधवी (मनाली कुळकर्णी)

बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०

परीस स्पर्श

कळीने उमलताना नवी स्वप्ने पाहिली;
पहाटे,परीस स्पर्शाने,
सोनेरी ती भासली...
अशीच तुमची माझ्या आयुष्यातली सावली;
साधा काठचा छोटा दगड मी,
तुम्हासच त्यात,
शिंपल्यातील मोती मी वाटली...!!!!!
- माधवी
(मनाली कुळकर्णी )

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

' नवीन बदल..'

घनघोर वादळासह पाऊस आला;
तुफान बरसून त्याने पूर आणला..

पुरामध्ये सारे गाव वाहून गेले;
काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले...

कालांतराने पूर ओसरला;
पडक्या भिंती सोडून,
बाकी सारेच घेऊन गेला...

जुने सावरून,नवीन घर,
आहे आत्ता बांधायचे;
पण बांधलेले घर पूर्वी सारखेच असेल,
हे नाही तितकेच गरजेचे....

आयुष्य हि असेच असते,
प्रत्येक वादळागणिक कोसळते;
जखमांचा ओलावा पुसत,
मनाच्या भिंतीना,अधिकच कणखर बनवते...

नवीन वादळे झेलण्यासाठी;
नवीन बदलांसह,त्यातून सरण्यासाठी...!!!!!!

- माधवी (मनाली कुळकर्णी)